*ढाळेगाव येथील ब्रॉयलर कुक्कुट पिल्लांचा मृत्यू एकमेकांखाली दबून, भीतीमुळे झाल्याचा प्रथमदर्शी अंदाज*
• पशुसंवर्धन विभागाकडून पिल्लांच्या मृत्यूंची तातडीने दखल
*ढाळेगाव येथील ब्रॉयलर कुक्कुट पिल्लांचा मृत्यू एकमेकांखाली दबून, भीतीमुळे झाल्याचा प्रथमदर्शी अंदाज*
• पशुसंवर्धन विभागाकडून पिल्लांच्या मृत्यूंची तातडीने दखल
• वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले
• पशुपक्षांमध्ये अनैसर्गिक मृत्यू आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन
लातूर, दि. २३ : जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील सचिन अशोक गुळवे यांच्या पोल्ट्री फार्ममधील ४५०० पैकी ४२०० मांसल ब्रॉयलर पिल्लांचा १६ ते २२ जानेवारी २०२५ दरम्यान मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्याच दिवशी, २२ जानेवारी रोजी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच मृत्य पक्षांचे वैद्यकीय नमुने औंध (पुणे) येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला पोल्ट्री मालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे या पिल्लांचा मृत्यू एकमेकांखाली दबून व भीतीने झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.
अंधोरी वैद्यकीय दवाखाना येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. गायकवाड हे २२ जानेवारी रोजी पोल्ट्री फार्मची नोंदणी करण्यासाठी गेले असता पिल्लांच्या मृत्यूची बाब निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी तत्काळ दखल घेवून मृत पक्षांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औंध येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यासोबतच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर आणि जिल्हा पारिषद सर्वचिकित्सालय सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एस. आर. साळवे, अहमदपूर तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एस. बी. क्षीरसागर, पशुधन विकास अधिकारी सुयोग येरोळे, अंधोरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गायकवाड व पशुधन विकास अधिकारी श्री. केसाळे यांनी पोल्ट्री फार्मची पाहणी केली.
या पाहणीमध्ये २५x१०० आणि ३२x१५० फुट आकाराच्या दोन शेडमध्ये १५ जानेवारी रोजी कुक्कुटपालकाने ४५०० एक दिवसाचे मांसल ब्रॉयलर पिल्ले ठेवली होती. याच दिवशी रात्री १२ ते २ वाजता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे पिल्ले घाबरून जावून त्यांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्याचे कुक्कुटपालकाने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला सांगितले. यावरून पिल्लांचा मृत्यू एकमेकांखाली दबून आणि भीतीमुळे झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असल्याचे पशुसंवर्धन पथकाचे म्हणणे आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने आज, २३ जानेवारी रोजी घटनास्थळी भेट दिली. तसेच आणखी ४ मृत पक्षी आणि पशुखाद्य तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. क्षीरसागर आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. येरोळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेवून उपाययोजना करण्याचे व सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता, अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यामध्ये पशुपक्षांमध्ये असाधारण मृत्यू आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर गुणवंतराव शिंदे यांनी केले आहे.
*****