चांगले वाचा,नीट शिका तरच जीवनात यशस्वी व्हाल
कथाकार जी.जी.कांबळे यांचा संदेश
लातूर,दि.२२ः जीवनाला योग्य दिशा देणार्या,मार्गदर्शक ग्रंथाचे खुप वाचन करा,मन लावून शिक्षण घ्या,चांगले शिकलात तर अधिकारी व्हाल,वाईट संगत,चोरी कराल तर शिक्षा भोगाल,असा संदेश प्रसिध्द कथाकार जी.जी.कांबळे यांनी येथे दिला.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत लातूरच्या सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयाला २० जानेवारी २०२५ रोजी २३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कै.सखाराम पाटील प्राथमिक विद्यालयाच्या सहकार्याने दि.२१ जानेवारी २०२५ रोजी शाळेच्या सभागृहात कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता,त्यावेळी जी.जी.कांबळे यांनी दोन मित्र ही कथा सांगून मुलांना वरील संदेश दिला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही.एस.जाधव हे होते.मंचावर ज्येष्ठ साहित्यिक अमृतराव सूर्यवंशी व ज्येष्ठ पत्रकार आबा गायकवाड,कै.सखाराम पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास वाघमोडे,ग्रंथपाल अंजुषा काटे यांची उपस्थिती होती.
शालेय जीवन अतिशय महत्वाचे आहे,या वयात मन लावून शिकले तर जीवनाची वाटचाल योग्य दिशेने जावू शकते,कुचाराई न करता नीट शिका,वाचनालयात जावून अवांतर वाचन करुन ज्ञानी,गुणवान बना,सभाधीट बना,असा मौलाचा सल्ला देत लहानपणी चांगले शिकणारा अधिकारी झाला आणि लहानसहान चोर्या करणारा पुढे चोरटा होवून तुरुंगात गेला यासंदर्भातली रंग्या कथासंग्रहातील दोन मित्र ही कथा जी.जी.कांबळे यांनी मुलांशी संवाद साधत कथन केली.
अमृतराव सूर्यवंशी यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतल्याने शिक्षक,मुख्याध्यापक,साहित्यिक होता आले याचे स्वतःचे उदाहरण देवून मुलांना शिक्षण व वाचन करण्याचा सल्ला दिला.पत्रकार आबा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप व्ही.एस.जाधव यांनी केला.
वाचनालयाचे सचिव बाळकृष्ण होळीकर यांनी ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा,बालकांसह १२ हजार ग्रंथ,२५ नियतकालिके,८ दैनिकामधून वाचकांना सेवा देण्यात येत आहे,ग्रंथालयाने २४ वा वर्धापन दिनात प्रवेश केल्याचा आनंद व्यक्त करुन,या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे वाचक सभासद होवून ग्रंथाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले,तसेच पाहुण्याचा परिचयही प्रास्ताविकातून करुन दिला.प्रारंभी ग्रंंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यंाच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.ग्रंथालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे ग्रंथ भेट देवून तर शाळेच्या वतीने मान्यवरांचे शाल,पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शाळेची माहिती शिक्षक व्ही.पी.तळेगावे यांनी केले दिली.सहशिक्षक नामदेव भंडारे यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक नामदेव जाधव, शैलजा शिंदे, उषा क्षीरसागर, कल्पना थोरात, वीरनाथ तळेगावे,अमोल कल्लेकर,ग्रंथालयाचे लिपिक संकेत होळीकर यांनी परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.