कामावरून कमी केलेल्या सफाई कामगार महिलांचे लातूर मनपासमोर बेमुदत उपोषण
लातूर शहर महापालिकेसमोर 20 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरु

कामावरून कमी केलेल्या सफाई कामगार महिलांचे लातूर मनपासमोर बेमुदत उपोषण
लातूर : लातूर शहरात स्वछता व साफसफाई करणाऱ्या महिला कामगार व सुपरवायझर
यांना गेल्या सहा महिन्यापासून कामावरून कमी करण्यात आले आहे. या
कामगारांनी खंडीत काळातील वेतनासह कामावर पूर्ववत घेण्यात यावे, या
मागणीसाठी लातूर शहर महापालिकेसमोर 20 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरु
केले आहे. हे उपोषण आंदोलन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
या आंदोलनात सर्व महिला कामगार, सुपरवायझर व संघटनेचे कार्यकर्ते,
पदाधिकारी यांचा समावेश आहे.
लातूर शहर महापालिकेच्या स्वछता व साफसफाई विभागात बाह्यस्रोत
यंत्रनेमार्फत 17 वर्षांपासून अत्याल्प वेतनावर महिला कामगार व सुपरवायझर
स्वछतेची कामे करत आहेत. मात्र 1 ऑगस्ट 2024 पासून सुमारे दीडशे महिला
कामगार व सुपर वायझर यांना अचानक तोंडी आदेशाने कामावरून कमी करण्यात
आले. यातील काही कामगार 17 वर्षांपासून तर काही 15 वर्षांपासून काम करत
होते. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.
कामगारांसाठीच्या कुठल्याही कामगार कायद्याची अंमलबजावणी केली नाही किंवा
सोयीसुविधा त्यांना दिलेल्या नाहीत. कामावर घेण्यासाठी यापूर्वी अनेक
वेळा अर्ज विनंत्या केलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी व मनपा
आयुक्तानी दखल घेऊन कामावरून कमी केलेल्या सर्व महिला सफाई कामगार व सुपर
वायझर यांना खंडीत काळातील वेतनासह पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे. या
मागणीसाठी मनपा समोर 20 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले
आहे. या उपोषण आंदोलनात बंडू कांबळे, महादेव कांबळे, रोहिदास राठोड,
विकास देडे, विद्या धावारे, वनिता धावारे, मंगल मोरे, रुक्मिणी कांबळे,
सुरेखा गायकवाड, मनीषा कांबळे, रेखा लोंढे, धम्मशिला बनसोडे, सुनंदाबाई
गायकवाड, लक्ष्मी पाटोळे, संगीता जगदाळे यांच्यासह 84 महिला कामगार
सहभागी आहेत.